छत्रपती संभाजीनगर: बिडकीन (ता. पैठण) येथे बसस्थानक परिसरामध्ये बॅनर लावण्यावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण होऊन झालेल्या तुंबळ हाणामारीत १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (दि. २३) रात्री घडली. तन्मय गणेश चोरमारे (रा. धनगर गल्ली, बिडकीन) असे मयत तरुणाचे नाव असून, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगेश मारुती दाणे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा भाचा ऋत्विक धर्मे याने दीपावलीनिमित्त शुभेच्छांचे बॅनर बसस्थानक परिसरात लावले होते. मात्र, त्याच ठिकाणी २३ ऑक्टोबर रोजी ऋषिकेश उर्फ चिमण जाधव याने आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर लावल्याने दोघांमध्ये फोनवरून वाद झाला. हा राग मनात धरून गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास ऋषिकेश जाधव, राहुल ठाणगे, सागर ठाणगे, प्रदीप ठाणगे, संतोष ठाणगे आणि इतर ३० ते ३५ जणांनी बसस्थानकाजवळ गप्पा मारत बसलेल्या ऋत्विक धर्मे, तन्मय चोरमारे आणि त्यांच्या मित्रांवर लोखंडी रॉड व लाठ्यांनी हल्ला केला. यात तन्मयच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्याला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र शुक्रवारी (दि. २४) दुपारी दोन वाजता त्याचा मृत्यू झाला.
तन्मयच्या मृत्यूची बातमी गावात समजताच नागरिकांमध्ये संताप उसळला. दुपारनंतर बिडकीन बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. गावात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी तातडीने दंगा नियंत्रण पथक आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला. सायंकाळनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींच्या शोधासाठी मोहीम राबवली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून इतर आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, या घटनेने तन्मयच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लहान वयातच वडिलांचे निधन झाल्यानंतर तन्मयची आई सोनाली चोरमारे आपल्या माहेरी बिडकीन येथे वास्तव्यास होती. आता मुलाचा मृत्यू झाल्याने त्या पूर्णपणे कोसळल्या आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा शोकाकूल वातावरणात तन्मयवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे बिडकीन परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*