छत्रपती संभाजीनगर : शहरातील पडेगाव परिसरात शनिवारी (दि.२५) सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात निवृत्त प्राध्यापक आणि त्यांची वकील पत्नी या दोघांचा जागीच मृत्यू झाला. पडेगाव रस्त्यावर भरधाव कारने दिलेल्या जोरदार धडकेत हे दाम्पत्य जागेवरच ठार झाले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

रामराव आत्माराम माने (७१) आणि रत्नमाला रामराव माने (६४, रा. देशमुखनगर, मिटमिटा) अशी मृतांची नावे आहेत. रामराव माने हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे निवृत्त प्राध्यापक होते, तर त्यांची पत्नी रत्नमाला माने या उच्च न्यायालयात वकिली करत होत्या.

शनिवारी संध्याकाळी माने दाम्पत्य पडेगावमधील आर्च आंगण परिसरात राहणाऱ्या नातेवाईकांच्या घरी निधनाचे सांत्वन करून पायी परत येत होते. त्या वेळी शहराकडून दौलताबाद टी पॉइंटकडे जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांना जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालकाने पळ काढला असून, छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. माने यांनी १९८० ते २०२४ या कालावधीत विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्य केले होते. २००६ ते २०१० दरम्यान ते अधिसभा व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य होते. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ख्याती होती. माने दाम्पत्यास अपत्य नसल्याने त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना आपली मुले मानले होते. त्यांच्या निधनाने विद्यापीठी वर्तुळासह विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

या दाम्पत्याचा अंत्यसंस्कार त्यांच्या मूळगावी धाराशिव जिल्ह्यातील रुईभर येथे रविवारी (दि.२६) पार पडणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

6,334 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क