छत्रपती संभाजीनगर : पेट्रोल पंपासाठी जागा डेव्हलप करून पंप सुरू करण्यासाठी पैसे द्या, अधिक परतावा देतो असे आमिष दाखवून तिघांनी एका वृद्ध महिलेला तब्बल ४० लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी जकिया बेगम अब्दुल्ला खान (६७, रा. कोहिनूर कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी मिर्झा यास्मीन बेगम मिर्झा बिस्मिल्ला बेग, बिस्मिल्ला बेग कयुम बेग (रा. डिलक्स अपार्टमेंट) आणि अजमत बेग कयुम बेग (रा. मिलकॉर्नर) यांनी फसवणूक केली. जकिया बेगम यांच्या पतींच्या नावावर रावरसपुरा येथे १८ गुंठे जमीन असून त्यातील काही भाग पेट्रोल पंपासाठी देण्यात आला होता.

ऑक्टोबर २०२३ मध्ये आरोपींनी जकिया यांच्या घरी येऊन पंप सुरू करण्यासाठी ४० ते ५० लाख रुपयांची आवश्यकता असल्याचे सांगितले. पंप सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांत पैसे परत देण्याचे तसेच अधिक परतावा देण्याचे आश्वासन दिले. या विश्वासात अडकून फिर्यादींनी नोव्हेंबर २०२३ मध्ये वेगवेगळ्या खात्यांतून एकूण ४० लाख रुपये आरोपींच्या खात्यात वर्ग केले.

त्यानंतर पेट्रोल पंपाची सर्व कामे पूर्ण करून फेब्रुवारी २०२४ मध्ये पंप सुरू झाला. मात्र, ठरल्याप्रमाणे रक्कम परत न करता आरोपींनी वेळ काढली आणि शेवटी रक्कम न दिल्याने जकिया बेगम यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. सिटी चौक पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,066 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क