छत्रपती संभाजीनगर : कोरोमंडल सिमेंट कंपनीचे बनावट लेटरहेड वापरून सायबर भामट्याने तब्बल चार लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. केवळ एका अक्षराचा फेरबदल करून “कोरोमंडल” ऐवजी “कोनोमंडल” या नावाने ही फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास उपनिरीक्षक सचिन कुंभार करत आहेत.
फिर्यादी विजय प्रभाकर तांदळे (वय ३५, रा. गणोरी, ता. फुलंब्री) हे अमर इन्फ्रास्ट्रक्चर या बांधकाम कंपनीत साईट सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. कंपनीला जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विविध प्रकल्पांची कंत्राटे मिळाली आहेत. त्यांना कामासाठी सिमेंटची आवश्यकता असल्याने त्यांनी पुरवठादार शोधण्यास सुरुवात केली होती.
दरम्यान, २६ जून रोजी एका अनोळखी व्यक्तीने त्यांना फोन करून “मी कोरोमंडल सिमेंट कंपनीतून बोलतो” असे सांगितले आणि व्हॉट्सअॅपवर लेटरहेड पाठवले. त्या व्यक्तीने आकर्षक दरात सिमेंट देण्याचे आश्वासन देत १,००० सिमेंट बॅगची ऑर्डर घ्यावी, असे सांगितले. विश्वास ठेवून तांदळेंनी २ लाख ७५ हजार २०० रुपयांचे ऑनलाइन पेमेंट केले.
यानंतर पुन्हा ३ जुलै रोजी त्याच व्यक्तीने संपर्क साधून “५०० बॅगची अजून ऑर्डर करा, सर्व माल एकाचवेळी पाठवतो” असे सांगत आणखी १ लाख ३७ हजार ५०० रुपये भरून घेतले. परंतु त्यानंतर कोणताही माल न आल्याने संशय निर्माण झाला.
५ जुलैला पुन्हा ५०० बॅग वाढविण्याची मागणी करण्यात आली तेव्हा तांदळेंना शंका आली. त्यांनी कंपनीचे नाव तपासले असता, “कोरोमंडल” ऐवजी “कोनोमंडल” असे लिहिले असल्याचे लक्षात आले. अशा प्रकारे सायबर भामट्याने बनावट लेटरहेड तयार करून एकाच अक्षरातील फरकाचा फायदा घेत सुमारे ४ लाख १२ हजार ७०० रुपयांचा गंडा घातला.
या प्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, संबंधित भामट्याचा शोध सुरू आहे. सायबर विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही व्यावसायिक व्यवहारापूर्वी कंपनीचे नाव, जीएसटी क्रमांक आणि अधिकृत संपर्क तपासणे अत्यावश्यक आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*