छत्रपती संभाजीनगर : महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटण्याच्या टप्प्यावर असतानाच शिंदेसेनेतून एक धक्कादायक आणि भावनिक घडामोड समोर आली आहे. शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी स्वतः निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. “जागा कमी मिळत असतील तर माझ्यासाठी जागा अडवू नका, माझ्या कार्यकर्त्यांना संधी द्या,” असे ठाम मत व्यक्त करत त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली.
महायुतीतील जागावाटपात शिंदेसेनेच्या विद्यमान सात नगरसेवकांच्या जागा सोडल्या जात असल्याने जंजाळ प्रचंड नाराज असल्याचे दिसून येत आहे. “ज्यांनी निष्ठेने पक्षासाठी काम केले, त्यांच्यावर अन्याय होत असेल तर मी निवडणूक कशी लढवू?” असा सवाल करत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शिंदेसेनेच्या सात नगरसेवकांच्या जागा भाजपला देण्यात आल्याने पक्षाची ताकद कमी होत असून कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
शिवसेनेच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जंजाळ म्हणाले की, भाजपसोबत करण्यात आलेल्या जागावाटपाबाबत आपल्याला तसेच खासदार संदिपान भुमरे आणि आमदार प्रदीप जयस्वाल यांनाही कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. यामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढली असून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, संजय शिरसाट यांनी ४१ जागांचा आग्रह धरलेला असताना, जंजाळ यांच्या या निर्णयामुळे भाजपवर दबाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीचा अंतिम जागावाटप फॉर्म्युला आज सायंकाळी संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर होणार आहे. मात्र, त्याआधीच जंजाळ यांनी घेतलेला हा निर्णय कार्यकर्त्यांच्या मनात घर करून गेला असून आगामी राजकीय समीकरणांवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GlraBleBDXk4TRi1fKkvIy
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*