छत्रपती संभाजीनगर : महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. युतीची अधिकृत घोषणा आणि जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर होण्याची वाट न पाहता, शिंदेसेनेने आपल्या सर्व इच्छुक उमेदवारांना तातडीने उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यामुळे युतीमध्ये बिघाडी तर झाली नाही ना, असा सवाल उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दिवसभर शिंदेसेनेचे नेते भाजपकडून जागावाटपाबाबत नव्या प्रस्तावाची प्रतीक्षा करत होते. दोन्ही पक्षांमध्ये समन्वय साधून तोडगा निघेल, अशी अपेक्षा होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत भाजपकडून कोणताही ठोस किंवा सकारात्मक निरोप न आल्याने शिंदेसेनेत अस्वस्थता वाढली. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक राहिल्याने वेळेचे गांभीर्य ओळखून पालकमंत्री संजय शिरसाट यांनी रविवारी रात्री आपल्या निवासस्थानी पक्षाच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक घेतली.

या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर ‘आता थांबून चालणार नाही’ असा स्पष्ट निर्णय घेण्यात आला. यानंतर सर्व इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. या निर्णयामुळे आजपासून शहरात शिंदेसेनेकडून मोठे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होण्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे.

छत्रपती संभाजीनगर हा पारंपरिक शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, सध्याच्या राजकीय समीकरणात भाजपनेही अनेक जागांवर दावा ठोकल्याने जागावाटपावरून तणाव निर्माण झाला आहे. शिंदेसेनेच्या या आक्रमक भूमिकेमुळे भाजपची पुढील रणनीती काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार मैदानात उतरवले, तर मैत्रीपूर्ण लढत होणार की शेवटच्या क्षणी तडजोड होऊन अर्ज मागे घेतले जाणार, हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/GlraBleBDXk4TRi1fKkvIy

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,160 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क