छत्रपती संभाजीनगर : महायुती तुटल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसताना पाहायला मिळत आहे. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी वाटपावरून भाजपमध्येच अंतर्गत वणवा पेटल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. वर्षानुवर्षे पक्षासाठी रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून ‘आयात’ उमेदवारांना झुकते माप दिल्याचा आरोप करत भाजपच्या प्रचार कार्यालयात आज संतापाचा मोठा उद्रेक झाला. काही वेळातच हा संताप गोंधळ, अश्रू, आरोप-प्रत्यारोप आणि आत्मदहनाच्या इशाऱ्यांपर्यंत पोहोचला.
प्रभाग क्रमांक १९ आणि २२ मधील इच्छुक महिला उमेदवारांनी अक्षरशः अश्रू ढाळत आपली व्यथा मांडली. उमेदवारी नाकारल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी नेत्यांना जाब विचारत कार्यालयात जोरदार घोषणाबाजी केली. काही नाराज कार्यकर्त्यांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिल्याने परिसरातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनले होते.
प्रभाग १९ मधून उमेदवारीसाठी प्रयत्नशील असलेल्या जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्या संध्या कापसे यांना भावना आवरता आल्या नाहीत. त्यांनी अश्रूंनी डोळे भरून नेत्यांना प्रश्न विचारला की, “नेहमी सांगता कामाला लागा, काम चांगलं आहे, मग तिकीट वाटपाच्या वेळी बाहेरच्यांना का आणता? आम्ही फक्त पक्षासाठी कामच करायचं का?” सर्वसाधारण प्रवर्गाची जागा असताना ओबीसी महिलेला ‘आयात’ करून निष्ठावंत कार्यकर्त्यांचा गळा घोटला जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
प्रभाग २२ मधील महिला कार्यकर्त्या सुवर्णा बताडे यांनी तर टोकाची भूमिका घेत आत्मदहनाचा इशारा दिला. “लहान मुलं असताना घरदार, संसार बाजूला ठेवून पक्षासाठी काम केलं, लाखो रुपये खर्च केले, आंदोलने केली. आज मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना तिकीट दिलं जात आहे,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. एका ज्येष्ठ कार्यकर्त्यानेही भावना व्यक्त करत सांगितले की, “४१ वर्षे पक्षाची सेवा केली, आम्हीच ज्यांना नेता म्हणून घडवलं त्यांनाच तिकीट देऊन आमचा अपमान केला जात आहे.”
एका अन्य कार्यकर्त्याने नोकरी सोडून भाजप वाढवल्याची व्यथा मांडली. “स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून पक्षासाठी काम केलं, पण आज बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिली जात आहे आणि आम्हा जुन्यांना डावललं जात आहे,” असे म्हणत त्यांनी नेत्यांवर तीव्र टीका केली. संतप्त कार्यकर्त्यांनी सावे, कराड आणि शितोळे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पैसे घेऊन तिकीट वाटप केल्याचे आरोप केले.
गोंधळ वाढत जाताच प्रचार कार्यालयात तोडफोडही झाली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी हस्तक्षेप करत अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, वाढत्या संतापामुळे सावे आणि कराड यांना मागच्या दाराने कार्यालयातून बाहेर पडावे लागल्याची चर्चा असून यामुळे पक्षाची मोठी नामुष्की झाल्याचे बोलले जात आहे.
या संपूर्ण प्रकारानंतर भाजपमधील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आली आहे. अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली असून ही बंडाळी भाजपला आगामी मनपा निवडणुकीत महागात पडू शकते, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GlraBleBDXk4TRi1fKkvIy
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*