छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी पार पडणार आहे. एकूण ११५ जागांसाठी ही निवडणूक होत असून, निवडणूक प्रक्रियेच्या महत्त्वाच्या टप्प्यांमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. आज, ३१ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून २ जानेवारी २०२६ पर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. या प्रक्रियेदरम्यान अनेक इच्छुकांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने नाराजीचा सूर उमटू लागला आहे. उमेदवारी नाकारल्यानंतर विविध पक्षांच्या कार्यालयांमध्ये गोंधळाचे प्रसंग पाहायला मिळाले.

याच पार्श्वभूमीवर भाजपमध्येही अंतर्गत असंतोष उफाळून आला आहे. उमेदवारी न मिळाल्याने भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी थेट पक्ष कार्यालयात उपोषण सुरू केले आहे. भाजपच्या पदाधिकारी वर्षा साळुंखे आणि दिव्या मराठे यांनी काल रात्रीपासून भाजप कार्यालयात उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या समर्थनार्थ इतर महिला कार्यकर्त्याही उपोषणस्थळी उपस्थित असून, उमेदवारी नाकारल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

उपोषणकर्त्या महिलांचे म्हणणे आहे की, पक्षासाठी सातत्याने काम करूनही त्यांना डावलण्यात आले असून स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. उमेदवारी वाटपात पारदर्शकता नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. वरिष्ठ नेत्यांनी याबाबत तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी मागणी उपोषणकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढत चाललेली नाराजी आणि आंदोलनांमुळे भाजपसमोर अंतर्गत समन्वय राखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. आगामी काळात पक्ष नेतृत्व या नाराजीवर कसा तोडगा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/GlraBleBDXk4TRi1fKkvIy

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,352 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क