छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्षाच्या शेवटच्या दिवशी अनेक इच्छुकांचा राजकीय सूर्य मावळल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले. बुधवारी शहरातील नऊ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांत सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्जांची छाननी सुरू होताच राजकीय पक्षांना एकामागून एक धक्के बसू लागले. प्रभागातील अ, ब, क आणि ड प्रवर्गानुसार छाननी होत असताना तब्बल ९७ उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले.
मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. पक्षांनी सर्व इच्छुकांना अर्ज भरण्याचे आदेश दिल्याने दिवसभर नऊही कार्यालयांत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. एकूण १,८७० अर्ज दाखल झाले होते. बुधवारी छाननीदरम्यान बी-फॉर्म जोडलेल्या अधिकृत उमेदवारांचेही अर्ज बाद झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. काही ठिकाणी दिग्गज उमेदवारांचे अर्ज अगदी किरकोळ त्रुटींमुळे बाद ठरल्याने समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त झाली.
छाननीदरम्यान उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी आक्षेप नोंदविले. काही ठिकाणी वादविवाद वाढल्याने सायंकाळी उशिरापर्यंत सुनावण्या सुरू होत्या. अखेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियमांच्या चौकटीत राहून अंतिम निर्णय घेतले. अर्ज बाद होण्यामागे शपथपत्रातील त्रुटी, नोटरी सह्यांचा अभाव, सूचक-अनुमोदकाचे नाव अंतिम मतदार यादीत नसणे, वयोमर्यादा अपुरी असणे, तसेच जात वैधता प्रमाणपत्र अथवा पडताळणी पावती न जोडणे, अशी कारणे पुढे आली.
झोननिहाय पाहता झोन क्रमांक १ मध्ये सर्वाधिक ३३ अर्ज बाद झाले, तर एकूण ९७ अर्ज बाद होऊन १,७२० अर्ज वैध ठरले. त्यामुळे निवडणूक रिंगणातील चित्र आता स्पष्ट झाले आहे. गुरुवारी अपक्ष उमेदवारांची मनधरणी सुरू होणार असून २ जानेवारी रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतरच निवडणुकीतील खऱ्या लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Kj1Sby1ZThs6fOYPl7g8RY
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*