छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या रणांगणातून गुरुवारी (१ जानेवारी) तब्बल ३३ अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राजकीय वातावरणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे. अर्ज माघारीच्या प्रक्रियेत प्रमुख राजकीय पक्षांनी दाखवलेली सक्रियता, तसेच बंडखोर उमेदवारांची केलेली वैयक्तिक पातळीवरील मनधरणी यामुळेच ही माघार झाल्याची चर्चा आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवार (२ जानेवारी) दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत देण्यात आली असून, त्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
अर्ज छाननीनंतर मोठ्या संख्येने उमेदवार रिंगणात शिल्लक राहिल्याने प्रमुख राजकीय पक्षांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. विशेषतः महायुती आणि महाविकास आघाडीतील काही बंडखोर उमेदवारांमुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन गेल्या २४ तासांत दोन्ही आघाड्यांतील वरिष्ठ नेत्यांनी स्वतः पुढाकार घेत अपक्ष व बंडखोर उमेदवारांशी संपर्क साधला. निवडणुकीनंतरच्या आश्वासनांपासून ते पक्षातील भविष्यातील भूमिकांपर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
या प्रयत्नांना यश येत शहरातील विविध प्रभागांतील एकूण ३३ उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. यामध्ये विविध राजकीय पक्षांशी संबंधित तसेच काही खऱ्या अर्थाने अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. काही उमेदवारांनी दोन अर्ज दाखल केल्याने त्यातील एक अर्ज मागे घेतल्याचेही समोर आले आहे. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक २६, २८ आणि २९ या भागांतून सर्वाधिक १२ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्याखालोखाल प्रभाग १८, १९ आणि २० मधून ८ अर्ज मागे घेण्यात आले आहेत. मात्र प्रभाग क्रमांक ६, १२, १३ आणि १४ मध्ये एकही उमेदवाराने अर्ज मागे घेतलेला नाही.
झोननिहाय पाहता विविध प्रभागांतून उमेदवारांनी माघार घेतली असून, संबंधित झोननिहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ही प्रक्रिया पार पडली. अर्ज माघारीनंतर आता उरलेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. दुपारी तीननंतर अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी एकूण १,४४६ उमेदवारांनी १,८७० उमेदवारी अर्ज दाखल केले होते. बुधवारी झालेल्या छाननी प्रक्रियेत ९७ अर्ज अवैध ठरले, तर १,३४९ अर्ज वैध ठरले आहेत. पहिल्याच दिवशी ३३ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता निवडणूक रिंगणात १,३१६ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. शुक्रवार हा अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने उर्वरित वेळेत आणखी काही माघारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Kj1Sby1ZThs6fOYPl7g8RY
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*