छत्रपती संभाजीनगर : राज्यात येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी प्रशासन आणि राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. ३० डिसेंबर २०२५ रोजी उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले असून, २ जानेवारी २०२६ हा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीसाठी शिक्षक, कर्मचारी यांची निवड करून त्यांना इलेक्शन ड्युटी लावली जाते. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रशासनाच्या गंभीर हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

संभाजीनगर जिल्ह्यात तब्बल दोन मृत शिक्षकांना चक्क इलेक्शन ड्युटी लावण्यात आल्याचे उघड झाले आहे. इतकेच नव्हे, तर त्यांच्यावर अधिकारीपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली असून, निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकारामुळे नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यातील शिक्षक संभाजी कर्डिले यांचे सुमारे तीन महिन्यांपूर्वी निधन झाले, तर शिक्षक राजेश बसवे यांचे १३ महिन्यांपूर्वी निधन झाले होते. असे असतानाही प्रशासनाकडून या दोन्ही शिक्षकांना निवडणुकीच्या कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. संबंधित कुटुंबीयांनी मृत्यू प्रमाणपत्रासह सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

यापूर्वी मतदार याद्यांमध्ये मृत व्यक्तींची नावे आढळल्याचे प्रकार समोर आले होते. मात्र आता मृत शिक्षकांच्या नावावर थेट इलेक्शन ड्युटी लावली जाणे, तसेच गैरहजेरीबद्दल नोटीस बजावणे हा प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा कळस असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. “आमची माणसं हयात नसतानाही आमच्या भावना दुखावल्या जात आहेत,” अशी भावना मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

या प्रकरणामुळे निवडणूक आयोगाच्या कामकाजावर आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Kj1Sby1ZThs6fOYPl7g8RY

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

688 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क