छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शांततापूर्ण आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १६३ अन्वये मनाई आदेश जारी केला आहे. त्यानुसार मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल फोन, कॉडलेस फोन, लाऊडस्पीकर, मेगाफोन, मायक्रोफोन तसेच वायरलेस उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या परिसरात कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगण्यास किंवा वापरण्यासही मनाई करण्यात आली आहे.
मतदान केंद्र परिसरात अनावश्यक गर्दी होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाने अधिकृत केलेले अधिकारी, निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कर्मचारी आणि मतदानासाठी रांगेत उभे असलेले मतदार वगळता पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच १०० मीटरच्या परिसरात मोबाईलवरून मतदान केंद्राचे छायाचित्रण किंवा चित्रीकरण करण्यासही बंदी राहणार आहे.
मतदान केंद्र परिसरात प्रचार करणे, मतदारांवर दबाव आणणे अथवा धमकावणे, परवानगी नसलेल्या वाहनांचा वापर करणे आणि वाहनांमधून मतदारांची ने-आण करणे यावरही निर्बंध असतील. ज्वलनशील किंवा स्फोटक पदार्थ तसेच हत्यारे घेऊन मतदान केंद्राच्या परिसरात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्राची तहसीलदारांनी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याची खातरजमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, वीज आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. एका मतदान केंद्रावर अंदाजे ८०० ते ८५० मतदार असण्याची शक्यता आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया २९ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी १९ इच्छुकांनी ३० अर्ज घेतले; मात्र एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ६ ऑक्टोबर असून, ७ ऑक्टोबरला छाननी आणि ९ ऑक्टोबरला उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख आहे.
२३ ऑक्टोबरला मतदान होणार असून, सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडेल. २७ ऑक्टोबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*