छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. निवडणूक काळात बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांना आळा घालण्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवर विशेष तपासणी पथके तैनात करण्यात आली आहेत. अशाच एका तपासणीदरम्यान शुक्रवारी (दि. २) सकाळी गोलवाडी परिसरात ३ लाख ५५ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.
गोलवाडी येथील तपासणी पथकाने सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास मारुती एक्सप्रेसो कार क्रमांक एमएच-एफपी ३४२२ थांबवून तपासणी केली. या वाहनाचा चालक मधुकर सिताराम पवार यांच्याकडे असलेल्या कारची सखोल तपासणी केली असता, वाहनाच्या डॅशबोर्डमध्ये ५०० रुपयांच्या एकूण ७१० नोटा आढळून आल्या. या नोटांची एकूण रक्कम ३ लाख ५५ हजार रुपये इतकी होती.
तपासणीदरम्यान सदर रोख रक्कम नेमकी कशासाठी बाळगली होती, याबाबत वाहनचालकाकडून समाधानकारक व वैध कागदपत्रांसह स्पष्टीकरण सादर करण्यात आले नाही. निवडणूक काळात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम वाहून नेणे हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन ठरत असल्याने, तपासणी पथकाने ही संपूर्ण रक्कम जप्त करण्याची कारवाई केली. जप्त केलेली रोकड पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
ही संपूर्ण कारवाई पथक प्रमुख सचिन गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या पथकात सहाय्यक पथक प्रमुख मनोज चव्हाण, पोलीस कर्मचारी एल. बी. इथापे, पी. बी. दायमा तसेच व्हिडिओग्राफर नयन मगर यांचा समावेश होता. निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता राखण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी अशा तपासण्या पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Kj1Sby1ZThs6fOYPl7g8RY
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*