छत्रपती संभाजीनगर : शहरात स्पोर्ट्स बाइकच्या खरेदी-विक्रीवरून झालेल्या शुल्लक वादाचे रूप गंभीर गुन्ह्यात रूपांतर झाले. काही मित्रांमध्ये झालेल्या वादानंतर तिघांसह सहा जणांनी मिळून एका १७ वर्षीय मुलाचे भररस्त्यावरून अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर सिडको पोलिसांनी वेगवान तपास करत अवघ्या सात तासांत अपहरण झालेल्या तरुणाची सुखरूप सुटका केली. ही थरारक घटना शुक्रवारी मध्यरात्री बजरंग चौक ते वाळूज रांजणगाव दरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहन (नाव बदलले), वय १७, हा शुक्रवारी रात्री सुमारे ११ वाजता मित्र आर्यनसोबत घराबाहेर गेला होता. मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास दोघे दुचाकीवरून मेडिकव्हर रुग्णालयाकडून बजरंग चौकाच्या दिशेने जात असताना एका कारमधून काही तरुण उतरले. त्यांनी दुचाकी अडवून रोहनला चालत्या गाडीवरून खाली ओढले आणि जबरदस्तीने कारमध्ये कोंबले. यानंतर चौघे कारमधून तर दोघे दुचाकीवरून पसार झाले.
घडलेला संपूर्ण प्रकार आर्यनने तात्काळ रोहनच्या आईला कळवला. घाबरलेल्या आईने त्वरित सिडको पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
तपासादरम्यान अपहरणकर्त्यांची कार वाळूज शिवारात असल्याची माहिती मिळताच पोलिस पथकाने कारचा पाठलाग केला. कारचा वेग कमी होताच पथकाने ती अडवून रोहनची सुखरूप सुटका केली. या कारमधून विवेक गणेश सोनवणे (वय १९), पांडुरंग माधव सोनवणे (वय २१) आणि रोहन सुनील डव्हळे (वय १९) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पुढील तपास सिडको पोलीस करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Kj1Sby1ZThs6fOYPl7g8RY
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*