छत्रपती संभाजीनगर :  शहरात स्वस्त दरातील साड्यांच्या ऑफरने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. आकाशवाणी चौक परिसरात हजारो रुपयांची साडी केवळ ५९९ रुपयांत देण्याची जाहिरात सोशल मीडियावर करण्यात आल्यानंतर ४ जानेवारी रोजी संबंधित कापड दुकानात प्रचंड गर्दी उसळली. गर्दी इतकी वाढली की काही वेळातच परिस्थिती हाताबाहेर गेली आणि अक्षरशः चेंगराचेंगरी झाली. या घटनेत तीन महिलांचा श्वास गुदमरल्याची माहिती असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.

भानुदासनगर येथील फ्रिडम टॉवरमध्ये ४ जानेवारी रोजी नवीन कापड दुकानाचे उद्घाटन करण्यात आले होते. उद्घाटनाच्या दिवशीच दुकान मालकांनी “हजारांची साडी ५९९ रुपयांत” अशी तगडी ऑफर जाहीर केली. या ऑफरची जाहिरात इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर महिलांनी मोठ्या संख्येने खरेदीसाठी गर्दी केली. अत्यंत कमी दरात कपडे व साड्या मिळत असल्याने ग्राहकांनी अक्षरशः झुंबड उडवली.

गर्दी नियंत्रणासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने काही वेळातच परिस्थिती गंभीर बनली. महिलांमध्ये धक्काबुक्की होऊन चेंगराचेंगरी झाली. विशेष म्हणजे संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन दुकानदारांनी रुग्णवाहिका, पिण्याचे पाणी, फिरती शौचालये, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग किंवा सुरक्षा कर्मचारी यांची कोणतीही व्यवस्था केली नव्हती. हा गंभीर निष्काळजीपणा असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी स्वतःहून दखल घेत कृष्णा रघुनाथ देशमुख (वय ३०, रा. देवळाई, सातारा) आणि संजय ललवाणी या दुकान मालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार पुंडलिक मानकापे यांनी फिर्याद दिली असून नागरिकांच्या जीवाशी खेळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे घटनेनंतरही दुसऱ्या दिवशी दुकानाच्या परिसरात गर्दी पाहायला मिळाल्याने पोलिसांनी सतर्कता वाढवली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Kj1Sby1ZThs6fOYPl7g8RY

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,546 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क