छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या निवडणुकीत राजकीय इतिहास घडला असून भाजपने तब्बल ५८ जागा जिंकत एकहाती सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. ११५ जागांच्या या महापालिकेत बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ५८ जागा भाजपने मिळवल्याने शहराच्या राजकारणात नवे पर्व सुरू झाले आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले असून, भाजप सत्ताधारी पक्ष म्हणून महापालिकेची सूत्रे हाती घेणार आहे.
या निवडणुकीत एमआयएमनेही जबरदस्त मुसंडी मारत ३३ जागा जिंकून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. अपेक्षेपेक्षा मोठे यश मिळाल्याने एमआयएम महापालिकेत विरोधी पक्षाची भूमिका बजावणार आहे. शिवसेना (शिंदे गट) ला मात्र मोठा फटका बसला असून पक्षाला केवळ १२ जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेना (उबाठा) ने ६ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला फक्त १ जागा मिळाली, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळू शकली नाही. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) ने मात्र १ जागेवर विजय मिळवला आहे. वंचित बहुजन आघाडीने ४ जागा जिंकल्या आहेत.
निकालानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी निवडणुकीत सत्ता आणि पैशाचा गैरवापर झाल्याचा आरोप करत, प्रत्येक मतासाठी पाच ते बारा हजार रुपये वाटल्याचा दावा केला. तरीही पराभव स्वीकारत त्यांनी भाजपवर शहराला पाणी न दिल्याचा आणि कर्जाच्या दरीत ढकलल्याचा आरोप केला.
शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी अपेक्षित यश न मिळाल्याचे मान्य करत उमेदवार निवडीत चूक झाल्याचे सांगितले. जनतेचा निर्णय स्वीकारावा लागतो, असेही ते म्हणाले.
एमआयएमच्या यशानंतर खासदार इम्तियाज जलील यांनी नागरिकांचे आभार मानत, छत्रपती संभाजीनगरने एमआयएमला हैदराबादनंतर मोठी ताकद दिल्याचे नमूद केले. या निकालामुळे शहराच्या राजकारणात मोठे बदल होणार हे निश्चित आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Kj1Sby1ZThs6fOYPl7g8RY
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*