छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला असून, पक्षाने लढविलेल्या ७१ जागांपैकी अवघ्या एकाच जागेवर विजय मिळवता आला आहे. विशेष म्हणजे हा विजयही पक्षाच्या संघटनात्मक ताकदीपेक्षा संबंधित उमेदवाराच्या वैयक्तिक प्रभावामुळे मिळाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. उर्वरित प्रभागांमध्ये काँग्रेस उमेदवारांची अवस्था अत्यंत विदारक झाली असून, अनेक ठिकाणी पक्षाला मतदारांचा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.
या पराभवामागे ढिसाळ नियोजन, विस्कळीत संघटना आणि प्रभावी नेतृत्वाचा अभाव ही प्रमुख कारणे ठरली आहेत. निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी प्रभागनिहाय आढावा घेत उमेदवारांची चाचपणी सुरू केली होती. त्या तुलनेत काँग्रेस पक्ष सगळ्याच आघाड्यांवर पिछाडीवर राहिल्याचे दिसून आले. अनेक प्रभागांमध्ये सक्षम उमेदवार मिळविण्यात पक्षाला अपयश आले.
ऐनवेळी तब्बल ७१ उमेदवारांना ‘बी फॉर्म’ देण्यात आले. मात्र त्यानंतर पक्षाकडून उमेदवारांना प्रचारासाठी आवश्यक ती मदत, दिशा किंवा रणनीती मिळाली नसल्याची नाराजी उघडपणे व्यक्त होत आहे. त्यातच बहुजन वंचित आघाडीसोबतची युती फिस्कटल्यामुळे काँग्रेसने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही प्रचार कार्यालयांचे उद्घाटन करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भेट दिली होती. तसेच खासदार डॉ. कल्याण काळे यांनी काही रॅली आणि कॉर्नर बैठका घेतल्या. मात्र हे प्रयत्न अपुरे ठरले. शहराध्यक्ष शेख युसूफ यांचे चिरंजीव प्रभाग क्रमांक तीनमधून लढत असल्यामुळे त्यांचे लक्षही मर्यादित राहिले.
भाजप, एमआयएम आणि वंचित आघाडीच्या प्रभावामुळे काँग्रेसचे उमेदवार बहुतांश प्रभागांमध्ये निष्प्रभ ठरले. अपवाद फक्त प्रभाग क्रमांक १४ मधील कुरैशी मलेका बेगम यांचा होता. त्यांच्या विरोधातील एमआयएम उमेदवाराने माघार घेतल्यामुळे त्यांचा विजय सुलभ झाला. २०१७ मध्ये काँग्रेसचे १२ नगरसेवक निवडून आले होते, मात्र यावेळी केवळ एका जागेवर समाधान मानावे लागल्याने पक्षासमोर अस्तित्वाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, आत्मचिंतनाची गरज प्रकर्षाने जाणवत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Kj1Sby1ZThs6fOYPl7g8RY
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*