राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षणासंदर्भात महत्त्वाची हालचाल सुरू झाली आहे. महापौर पदासाठी आरक्षण निश्चित करताना निर्माण झालेल्या पेचावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत पत्रक नगरविकास विभागाने जारी केले असून, ही बैठक 22 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता मंत्रालयात होणार आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थान राज्याचे नगरविकास मंत्री भूषवणार आहेत.
शासनाच्या पत्रानुसार, राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये महापौर पदासाठी आरक्षण ठरवण्याबाबत सध्या संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आरक्षणाची प्रक्रिया स्पष्ट करण्यासाठी आणि अंतिम निर्णय घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात ही बैठक पार पडणार असून, त्यामध्ये नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, वरिष्ठ सचिव तसेच संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महापौर पदाचे आरक्षण हे स्थानिक स्वराज्य संस्थांतील सत्तास्थापनेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक शहरांमध्ये महापौर पदावर कोणत्या प्रवर्गाला संधी मिळणार, यावरून राजकीय चर्चा आणि मतभेद तीव्र झाले आहेत. त्यामुळे या बैठकीत आरक्षणाची सोडत कशी निघते, याकडे राज्यभरातील राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
नगरविकास विभागाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी हे पत्र जारी केले असून, त्यात आरक्षण निश्चितीचा निर्णय नगरविकास मंत्र्यांच्या निर्देशानुसार घेतला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. बैठकीतील चर्चेनंतर महापौर पदाच्या आरक्षणाबाबत अंतिम सोडत काढली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
या पत्राची प्रत मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री कार्यालय तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे. यावरून राज्य सरकार या विषयाकडे किती गांभीर्याने पाहत आहे, हे स्पष्ट होते. या बैठकीतून निघणारा निर्णय केवळ प्रशासकीयच नव्हे, तर राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा ठरणार असून, येत्या काळातील महापालिकांमधील सत्तास्थापनेची दिशा याच निर्णयावर अवलंबून राहणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/F4uD1Fqnz3sBgCKFsrOSDq
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*