छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधारी आणि विरोधी गटांनी युती-आघाड्यांचे गणित जवळपास निश्चित केले आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात अखेर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी युती झाली असून, दोन्ही पक्ष एकत्रितपणे ५२ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. या युतीअंतर्गत भाजप २७ तर शिवसेना (शिंदे गट) २५ जागांवर उमेदवार देणार आहे. मंगळवारी (दि. १९) ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची अधिकृत घोषणा केली.

महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना युती न झाल्याचा फटका शिवसेनेला बसल्याने, जिल्हा परिषद निवडणुकीत शक्य तेथे भाजपसोबत युती करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक नेत्यांना दिले होते. त्यानुसार भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये दोन टप्प्यांत चर्चा झाली. महापालिकेप्रमाणे दीर्घ चर्चेचे गुऱ्हाळ न करता, यावेळी थेट युतीचा निर्णय घेण्यात आला.

या चर्चांमध्ये भाजपकडून मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार प्रशांत बंब, आमदार संजय केणेकर, आमदार अनुराधा चव्हाण, शहराध्यक्ष किशोर शितोळे सहभागी झाले होते. शिवसेनेकडून पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे, आमदार संजना जाधव, आमदार रमेश बोरनारे यांनी सहभाग घेतला. एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीनंतर युतीची घोषणा करण्यात आली.

मात्र, सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यांमध्ये भाजपसोबत युती करण्यास आमदार अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट नकार दिला आहे. “सिल्लोड मतदारसंघात भाजपची ताकद नाही. येथे शिवसेना स्वबळावर सर्व जागा लढवणार,” असे सत्तार यांनी जाहीर करत स्वतंत्र भूमिका घेतली आहे. त्यामुळे सिल्लोड आणि सोयगाव मतदारसंघातील जागावाटपाचा निर्णय पक्षश्रेष्ठींकडे सोपवण्यात आला आहे.

दुसरीकडे, विरोधी महाविकास आघाडीनेही जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांनी एकत्रितपणे ५२ जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये शिवसेना (उबाठा) २७ तर काँग्रेस २५ जागा लढवणार आहे. वंचित बहुजन आघाडीला ५ जागा देण्यावर जवळपास एकमत झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना पैठण तालुक्यातील २ ते ३ जागा देण्याचा निर्णय झाला आहे.

महाविकास आघाडीच्या बैठका शिवसेना उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांच्या क्रांती चौकातील कार्यालयात दोन दिवस चालल्या. मंगळवारी (दि. २०) सलग सात तास चाललेल्या बैठकीत भाजप-शिवसेना युतीच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आघाडी मजबूतपणे निवडणूक लढवेल, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. या बैठकीस उद्धवसेनेचे उपनेते सुभाष पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, जगन्नाथ काळे, विश्वास औताडे, वंचितचे योगेश बन, अमित भुईगळ आदी उपस्थित होते. कन्नड तालुक्यातील काही जागांवर अद्याप एकमत न झाल्याने त्यावर लवकरच तोडगा काढला जाईल, असे नेत्यांनी सांगितले.

दरम्यान, युतीची घोषणा झाल्यानंतर भाजपमध्ये अंतर्गत नाराजीही उफाळून आली. वैजापूर येथे मनपा निवडणुकीत तिकीट न मिळालेल्या नाराज कार्यकर्त्यांनी ‘युती तोडा’च्या घोषणा देत मंत्री अतुल सावे यांचे वाहन रोखले. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

एकीकडे युती-आघाड्यांचे दावे सुरू असले तरी, जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर न केल्याने बंडखोरी आणि उमेदवार पळवापळवीचा धोका कायम आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणूक लढत अत्यंत चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/F4uD1Fqnz3sBgCKFsrOSDq

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

994 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क