महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. शुक्रवारी (दि. १६ जानेवारी) सकाळी १० वाजता एकाच वेळी शहरातील २९ प्रभागांच्या मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. प्रशासनाने मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण केली असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत सर्व प्रभागांचे अधिकृत निकाल जाहीर होतील, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
मतमोजणीची प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली जाणार आहे. सुरुवातीला पोस्टल बॅलेट म्हणजेच टपाली मतदानाची मोजणी करण्यात येईल. त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू होईल. प्रत्येक प्रभागासाठी ८ ते २१ टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून संपूर्ण प्रक्रियेवर ९ निवडणूक निर्णय अधिकारी देखरेख करणार आहेत. उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असताना मतमोजणी होणार असल्याने पारदर्शकतेवर विशेष भर देण्यात आला आहे. यासाठी स्वतंत्र आणि अनुभवी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रभागनिहाय फेऱ्यांची संख्या वेगवेगळी असणार आहे. प्रभाग क्रमांक ८ मध्ये केवळ ६ फेऱ्या असल्याने या प्रभागाचा निकाल सर्वात आधी लागण्याची शक्यता आहे. तर प्रभाग क्रमांक ६ आणि १४ मध्ये सर्वाधिक २६ फेऱ्या असल्याने या प्रभागांचे निकाल उशिरा येण्याची शक्यता आहे.
शहरात एकूण चार ठिकाणी मतमोजणी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. गरवारे स्टेडियम येथे प्रभाग क्रमांक १, ७, ८, ९, १०, ११, २३, २४ आणि २५ यांची मतमोजणी होणार आहे. शासकीय तंत्रनिकेतन येथे प्रभाग १५, १६, १७, २६, २८ आणि २९ यांची मतमोजणी होईल. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रभाग १८, १९, २०, २१, २२ आणि २७ तर सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये प्रभाग क्रमांक ३, ४, ५, ६, १२, १३ आणि १४ यांची मतमोजणी पार पडणार आहे.
निकालाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांसह नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली असून शहराच्या राजकारणाची दिशा ठरवणारा हा निकाल ठरणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Kj1Sby1ZThs6fOYPl7g8RY
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*