छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी मंगळवार, १६ जानेवारी रोजी पार पडणार असून, या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट सुरक्षा व वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. मतमोजणी केंद्रांच्या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
मतमोजणी प्रक्रिया शहरातील चार ठिकाणी होणार आहे. गरवारे हायटेक फिल्म, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि सेंट फ्रान्सिस हायस्कूल या ठिकाणी सकाळी ७ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. या सर्व केंद्रांवर दंगा काबू पथकासह एसआरपीएफचे सुमारे ४०० हून अधिक शस्त्रधारी जवान तैनात करण्यात येणार असून, ते केंद्रांभोवती कडा पहारा देत गर्दी नियंत्रणाचे काम करतील.
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मतमोजणी केंद्रांच्या परिसरातील तीन प्रमुख मार्ग दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये विट्स हॉटेल चौक ते गाडे चौक, एसएससी बोर्ड टी पॉइंट ते पीरबाजार चौक तसेच सेव्हन हील ते आकाशवाणी चौकपर्यंतचा एक बाजूचा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या मार्गावरील दुसरी बाजू वाहतुकीसाठी खुली ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुभाष भुजंग यांनी केले आहे.
दरम्यान, मतमोजणीदरम्यान केंद्रांच्या १०० मीटर परिसरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या परिसरात मोबाइल, टॅब्लेटचा वापर पूर्णतः बंदीस्त असेल. तसेच आगपेटी, लायटर आणि तंबाखूजन्य पदार्थ घेऊन जाण्यासही मनाई करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या वाहनांनाच या परिसरात प्रवेश दिला जाणार असून, यात निवडणूक अधिकारी, कर्मचारी, उमेदवार व त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींचा समावेश असेल. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी जारी केले आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Kj1Sby1ZThs6fOYPl7g8RY
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*