महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी आज सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया सुरू आहे. सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. मात्र, मतदानादरम्यान मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईसाठी वापरल्या जाणाऱ्या मार्कर पेनच्या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा आणि वाद निर्माण झाला आहे.
ठाकरे बंधू तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून मार्कर पेनद्वारे शाई लावण्यास तीव्र विरोध करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, “मार्कर पेन वापरण्याचा निर्णय हा निवडणूक आयोगाचा आहे. याबाबत कोणाला आक्षेप असल्यास त्यासंबंधी योग्य ती कारवाई व्हावी,” असे मत व्यक्त केले आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने परिपत्रक काढत स्पष्ट भूमिका मांडली आहे. आयोगाने म्हटले आहे की, बोटावर लावलेली शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही. मतदान झाल्यानंतर संबंधित मतदाराची नोंद यंत्रणेत घेतली जाते. त्यामुळे शाई पुसण्याचा प्रयत्न केला, तरी त्या मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही. शाई पुसून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य असून, अशा प्रकारची कृती आढळल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही आयोगाने दिला आहे.
मार्कर पेनच्या वापराबाबत आयोगाने माहिती देताना सांगितले की, १९ नोव्हेंबर २०११ आणि २८ नोव्हेंबर २०११ रोजी निर्गमित आदेशांनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मार्कर पेनचा वापर केला जात आहे. या आदेशानुसार मतदाराच्या नखावर आणि नखाच्या वरच्या त्वचेवर तीन ते चार वेळा ठळकपणे शाई लावण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य टाळावे आणि लोकशाही प्रक्रियेवर विश्वास ठेवावा, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने सर्व मतदारांना केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Kj1Sby1ZThs6fOYPl7g8RY
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*