छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील चांगतपुरी गावाजवळ सोमवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला. उजव्या कालव्याच्या पुलालगत चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट पाण्यात कोसळली. रात्री अकरा ते साडेअकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. अपघातात चालकाने प्रसंगावधान राखत कारमधून बाहेर उडी मारून जीव वाचवला; मात्र कारमधील पती-पत्नी पाण्यात बुडाल्याची भीती व्यक्त होत असून ते अद्याप बेपत्ता आहेत.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. कालव्यात पाणी असल्याने बचावकार्याला अडचणी निर्माण होत होत्या. दरम्यान, कारमधील प्रवाशांना वाचवण्यासाठी गावातील एक तरुण कालव्यात उतरला; मात्र तोही पाण्यात बेपत्ता झाला. त्यामुळे एकूण तिघांचा शोध सुरू आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे.

रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थ, पोलीस आणि आपत्कालीन पथकाच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यात आली. जेसीबीच्या सहाय्याने पाण्यातील कार बाहेर काढण्यात आली; मात्र त्यात कोणीही आढळले नाही. अंधार आणि पाण्याचा वेग यामुळे शोधकार्य अधिक कठीण बनले होते. प्रशासनाकडून सकाळी पुन्हा शोधमोहीम तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रात्रीच्या वेळी वाहन चालवताना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,480 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क