छत्रपती संभाजीनगर : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात भडकलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर तणाव निर्माण झाला असून त्याचे परिणाम आता स्थानिक औद्योगिक क्षेत्रावरही दिसू लागले आहेत. आखाती देशांतून होणारी पेट्रोलियम पदार्थांची आयात युद्धामुळे विस्कळीत झाल्याने औद्योगिक गॅसच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी, शहरालगतच्या एमआयडीसी परिसरातील सुमारे ४०० हून अधिक उद्योग बंद पडण्याच्या संकटात सापडले असून जवळपास २ लाख कामगारांच्या रोजगारावर गदा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

माहितीनुसार, ५ मार्चपासून व्यावसायिक गॅसचा पुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे. सध्या उद्योगांकडे उपलब्ध असलेल्या मर्यादित साठ्यावर उत्पादन सुरू आहे. मात्र हा साठा संपल्यानंतर उद्योगांना उत्पादन थांबवण्याशिवाय पर्याय उरणार नाही. ऑटोमोबाईल, ब्रीव्हरेज, बॉटलिंग, फार्मा तसेच मद्य उत्पादन करणाऱ्या उद्योगांवर या गॅस तुटवड्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

एमआयडीसी परिसरातील सुमारे ३०० ते ४०० उद्योगांचे बॉयलर्स पूर्णपणे गॅसवर चालतात. दररोज सुमारे ७२ मेट्रिक टन गॅसची गरज या उद्योगांना भासते. गॅस पुरवठा खंडित झाल्याने बॉयलर बंद करण्याची वेळ आल्यास उद्योगांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो.

कॅनपॅक इंडिया लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम पोतदार यांनी सांगितले की, त्यांच्या उद्योगाला दररोज सुमारे १२ मेट्रिक टन गॅसची आवश्यकता असते आणि सध्या फक्त चार दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. कंपनीत काचेच्या बाटल्या व अ‍ॅल्युमिनियम कॅनचे उत्पादन केले जाते आणि येथे सुमारे एक हजार कर्मचारी कार्यरत आहेत. बॉयलर बंद झाल्यास सुमारे ६०० कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसू शकतो, असे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी सांगितले की, रिफायनरीमधून व्यावसायिक गॅस निर्मिती सध्या बंद आहे. त्यामुळे उद्योग आणि हॉटेल व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे. काही अत्यावश्यक सेवांसाठी मर्यादित गॅस पुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू असून उद्योगांनी राज्य व केंद्र शासनासमोर परिस्थिती मांडली आहे. लवकरच यावर तोडगा निघेल, अशी अपेक्षा उद्योग क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

315 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क