छत्रपती संभाजीनगर : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याचे पडसाद आता सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर उमटू लागले आहेत. पेट्रोलियम पदार्थांच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरच्या वितरणावर परिणाम होत असून अनेक ठिकाणी गॅस वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यामुळे नागरिकांना स्वयंपाकासाठी पर्यायी साधनांचा वापर करण्याची वेळ आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडर उशिरा मिळत असल्याने अनेक कुटुंबांनी पुन्हा चुलीचा आधार घेतल्याचे चित्र काही भागांत पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागात लाकूडफाटा वापरून स्वयंपाक करण्याची पद्धत पुन्हा दिसू लागली असून शहरांमध्ये मात्र नागरिकांनी इलेक्ट्रिक उपकरणांकडे वळण्यास सुरुवात केली आहे.
विशेषतः इलेक्ट्रिक इंडक्शन शेगडींची मागणी बाजारात झपाट्याने वाढली आहे. गॅसच्या तुलनेत सहज उपलब्ध आणि वापरण्यास सोपी असल्यामुळे अनेकांनी इंडक्शन शेगडी खरेदी करण्यास प्राधान्य दिले आहे. परिणामी, इलेक्ट्रॉनिक्स दुकानांमध्ये इंडक्शन शेगडींचा साठा कमी पडू लागल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. काही दुकानांमध्ये तर इंडक्शन शेगडी पूर्णपणे ‘आऊट ऑफ स्टॉक’ झाल्याचे सांगितले जात आहे.
व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठवड्यापासून इंडक्शन शेगडी खरेदीसाठी ग्राहकांची संख्या अचानक वाढली आहे. अनेक ग्राहक एकाच वेळी दोन-तीन मॉडेल्सची चौकशी करत असल्याने उपलब्ध साठा लवकर संपत आहे. नवीन माल मागवण्यात आला असला तरी तो येण्यास काही दिवस लागू शकतात.
दरम्यान, गॅस वितरणातील अडचणी आणि वाढते दर यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती बजेटवर अतिरिक्त ताण पडत असल्याचे दिसून येत आहे. स्वयंपाकासाठी पर्यायी साधने वापरण्याची गरज निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. परिस्थिती लवकर सुरळीत व्हावी आणि गॅस पुरवठा नियमित व्हावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*