छत्रपती संभाजीनगर : शहरासह संपूर्ण मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढू लागला असून उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. दुपारच्या वेळेत बाहेर पडणे नागरिकांसाठी असह्य होत असून उन्हाचा चटका आणि उकाडा अक्षरशः ‘तापदायक’ ठरत आहे. गुरुवारी (दि.१२) छत्रपती संभाजीनगर शहराचे कमाल तापमान ३९.८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १९.१ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले असल्याची माहिती चिकलठाणा वेधशाळेकडून देण्यात आली.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार शुक्रवारी (दि.१३) मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून त्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या तापमानामुळे शहरातील रस्ते दुपारच्या वेळी तुलनेने ओस पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले की, बिहारपासून छत्तीसगडपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होत आहे. देशातील काही भागात तापमानात मोठी तफावत दिसून येत आहे. गुरुवारी राजस्थानमधील पाली येथे देशातील सपाट भूभागावरील नीचांकी ९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर गुजरातमधील राजकोट येथे ४२ अंश सेल्सिअस इतके उच्चांकी तापमान नोंदविण्यात आले.

गेल्या आठवडाभरापासून तापमानात सातत्याने वाढ होत असून ही वाढ आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सकाळी आणि संध्याकाळी काही प्रमाणात गारवा जाणवत असला तरी दुपारी मात्र उन्हाचा तडाखा अधिक जाणवत आहे.

दरम्यान, कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास आणि सरासरी तापमानापेक्षा सुमारे ४.५ अंशांनी वाढ झाल्यास उष्णतेची लाट समजली जाते. हवामान विभागाने १३ मार्चपासून राज्यात काही ठिकाणी वादळी पावसाला पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता देखील वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हापासून बचावासाठी पाणी अधिक प्रमाणात पिणे, दुपारी बाहेर जाणे टाळणे आणि आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

121 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क