छत्रपती संभाजीनगर : पर्यावरणपूरक आणि आरामदायी प्रवासाची सुविधा देणाऱ्या ई-शिवाई बस सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरासह जिल्ह्यात विविध मार्गांवर सध्या ७३ ई-बस धावत असून, मुख्य बसस्थानकावरून २६ बसची सेवा सुरू आहे. मात्र चार्जिंग सेंटरच्या अभावामुळे काही मार्गांवर नवीन बस सुरू करण्याचे नियोजन काही काळापासून रखडले होते. आता रेल्वेस्टेशन परिसर आणि सिल्लोड येथे उभारण्यात येणाऱ्या चार्जिंग सेंटरचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून, हे काम पूर्ण होताच आणखी ३५ नवीन ई-बस शहरात दाखल होणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी दिली.

मध्यवर्ती बसस्थानकावरून जळगाव, शिर्डी आणि अहिल्यानगर या महत्त्वाच्या मार्गांवर ई-बस सेवा सुरू करण्याचे नियोजन एसटी महामंडळाने केले होते. मात्र पुरेशी चार्जिंग सुविधा उपलब्ध नसल्यामुळे या बस सुरू करण्यास विलंब झाला. आता रेल्वेस्टेशन परिसरातील चार्जिंग सेंटरचे काम पूर्ण होताच मुख्य बसस्थानकाला २० नवीन ई-बस मिळणार आहेत. त्यामुळे येथील ई-बसची एकूण संख्या ४६ वर पोहोचणार आहे. या बसमुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि वातानुकूलित प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, सिल्लोड आगारातही चार्जिंग सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर सिल्लोड आगारासाठी मंजूर झालेल्या १५ ई-बस विविध मार्गांवर धावू लागतील. त्यामुळे सिल्लोड आणि परिसरातील प्रवाशांना आधुनिक व आरामदायी बससेवेचा लाभ मिळणार आहे.

एसटी महामंडळाच्या रेल्वेस्टेशन परिसरातील जागेवर उभारण्यात येणाऱ्या चार्जिंग सेंटरमध्ये १८ चार्जर पॉइंट्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या केंद्रात दररोज सुमारे ७० ई-बस चार्ज करण्याची क्षमता असणार आहे. त्यामुळे स्थानिक आगारातील बसांसह इतर आगारांमधून येणाऱ्या बसनाही येथे चार्जिंगची सुविधा मिळेल. आगामी काळात ई-बसच्या संख्येत वाढ होणार असून, प्रवाशांसाठी पर्यावरणपूरक आणि आधुनिक सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय अधिक मजबूत होणार असल्याचे एसटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

515 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क