मुंबई : उन्हाळी सुट्ट्या, सण-उत्सव आणि ग्रामीण भागातून शहरांकडे वाढलेल्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर Maharashtra State Road Transport Corporation ने महत्त्वाचा निर्णय घेत एसटी बसच्या भाड्यात सुमारे १० टक्के वाढ जाहीर केली आहे. ही भाडेवाढ १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत लागू राहणार असून, साध्या आणि जलद (फास्ट) बससेवांवरच ही वाढ लागू असेल.
महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळ्यात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. विशेषतः गावी जाणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असल्याने बससेवेवर ताण निर्माण होतो. यामुळे सेवा नियमित ठेवण्यासाठी आणि वाढीव फेऱ्या चालवण्यासाठी अतिरिक्त खर्च येतो. हा खर्च भागवण्यासाठी भाडेवाढ आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, वातानुकूलित, शिवशाही, जनशताब्दी आणि इतर प्रीमियम बससेवांमध्ये कोणतीही भाडेवाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे या सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, सामान्य प्रवाशांना या वाढीचा थेट परिणाम जाणवणार आहे.
तसेच, १५ एप्रिलपूर्वी आरक्षित केलेल्या तिकिटांवरही फरकाची रक्कम वसूल केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आधीच बुकिंग केलेल्या प्रवाशांनाही अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.
दरम्यान, काही प्रमुख मार्गांवरील नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. नागपूर मार्गासाठी पूर्वीचे ८४५ रुपये आता ९३० रुपये झाले आहेत, तर यवतमाळसाठी ६३४ वरून ६९७ रुपये करण्यात आले आहेत. पुणे व लातूर मार्गासाठी ४९३ वरून ५४२ रुपये, सोलापूरसाठी ५५४ वरून ६०९ रुपये, अकोल्यासाठी ४२३ वरून ४६५ रुपये, तर जालना मार्गासाठी १०२ वरून ११२ रुपये भाडे आकारले जाणार आहे.
महागाईच्या पार्श्वभूमीवर या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांवर आर्थिक ताण वाढणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*