छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला असून, या घटनेने उपस्थित सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले. “परिस्थितीवर मात करून स्वप्न पूर्ण करायचं” हे केवळ वाक्य नसून ते प्रत्यक्षात उतरवणारा एक तरुण या मैदानावर पाहायला मिळाला.


 

भरतीच्या मैदानावर शेकडो तरुण वर्दीचं स्वप्न डोळ्यांत साठवून वेगाने धावत होते. कोणाच्या पायात महागडे स्पोर्ट्स शूज, तर कोणाच्या अंगात ब्रँडेड कपडे… पण या गर्दीत एक वेगळीच झळाळी असलेला तरुण सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता. कारण तो पायात साधी चप्पल घालून धावत होता!

ही बाब पोलीस उपायुक्त विक्रम साळवी यांच्या नजरेत भरली. त्यांनी त्या तरुणाला थांबवून विचारणा केली, “तू चप्पल घालून का धावत आहेस?” यावर त्या तरुणाने दिलेलं उत्तर मन हेलावून टाकणारं होतं. “साहेब, शूज घेण्यासाठी पैसे नाहीत. पण वर्दीचं स्वप्न मात्र मोठं आहे. ते पूर्ण करणारच,” असं तो निर्धाराने म्हणाला.

या एका वाक्यात त्याची जिद्द, संघर्ष आणि स्वप्नांची उंची दिसून आली. हे ऐकून विक्रम साळवी भावूक झाले. परिस्थितीसमोर हार न मानता, अडचणींना पायदळी तुडवत ध्येयाच्या दिशेने धावणाऱ्या त्या तरुणाचं त्यांनी मनापासून कौतुक केलं.

क्षणाचाही विलंब न करता साळवींनी आपल्या खिशातून पैसे काढले आणि त्या तरुणाला शूज आणण्यासाठी दिले. काही वेळातच नवीन, शुभ्र शूज मैदानावर आले. विशेष म्हणजे, साळवींनी स्वतः त्या तरुणाला शूज घालून दिले. त्या क्षणी मैदानावर उपस्थित प्रत्येकजण भारावून गेला.

या प्रसंगाचा व्हिडिओ कोणीतरी काढत असताना, साळवींनी नम्रपणे “व्हिडिओ करू नका, ही छोटीशी मदत आहे,” असे सांगितले. मात्र हा भावनिक क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांकडून दोघांच्याही जिद्दीला आणि संवेदनशीलतेला सलाम केला जात आहे.

एकीकडे संघर्ष करणारी तरुणाई आणि दुसरीकडे त्या संघर्षाला समजून घेणारे अधिकारी—या दोघांच्या भेटीतून उभा राहिलेला हा प्रसंग अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

869 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क