छत्रपती संभाजीनगर : नवनियुक्त जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी पदभार स्वीकारताच प्रशासनात शिस्त आणण्यासाठी अॅक्शन मोड सुरू केला आहे. गेल्या दोन दिवसांत त्यांनी सकाळी १० वाजताच विविध शासकीय कार्यालयांमध्ये अचानक फेरफटका मारून कामकाजाची पाहणी केली. या पाहणीत गैरहजर तसेच उशिरा येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर त्यांनी थेट कारवाईचा बडगा उगारला.

९ एप्रिल रोजी ३ अधिकारी आणि १२ कर्मचारी गैरहजर आढळून आले, तर १० एप्रिल रोजी १ अधिकारी व १५ कर्मचारी उशिरा कार्यालयात दाखल झाले. या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. अचानक तपासणीतून प्रशासनात खळबळ उडाली असून अधिकारी व कर्मचाऱ्यांची धांदल उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दरम्यान, कार्यालयीन कामकाज अधिक पारदर्शक व वेगवान करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ऑफलाईन पद्धतीने संचिका (फाईल्स) सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी स्पष्ट सूचना देत सर्व कामे ऑनलाईन प्रणालीद्वारेच सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ऑफलाईन संचिका मंजूर केल्या जाणार नसल्याचे सांगत त्यांनी अनेक फाईल्स परत पाठवल्या. यामुळे प्रशासनात डिजिटल कामकाजाला चालना मिळणार आहे.

दुसरीकडे, जिल्ह्यातील प्रलंबित फेरफार नोंदींचा प्रश्न गंभीर बनला आहे. तलाठी व मंडळ अधिकारी स्तरावर तब्बल १० हजार ९८ फेरफार प्रकरणे रखडली असून शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. यामध्ये सर्वाधिक ३३२६ प्रकरणे छत्रपती संभाजीनगर तालुक्यात प्रलंबित आहेत.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी विशेष बैठक बोलावली आहे. एक महिन्यापेक्षा जास्त काळ प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा घेऊन त्यावर तत्काळ तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. वेरूळ येथे घृष्णेश्वर विकास आराखड्याच्या बैठकीनंतर ही महत्त्वाची बैठक पार पडणार असून प्रशासन गतिमान करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्न अधिक तीव्र होणार आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

627 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क