वैजापूर : समृद्धी महामार्गावर वैजापूर शिवारात सोमवारी (दि. १३) सायंकाळी सातच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव कार आणि अज्ञात वाहनाच्या धडकेत कारला आग लागून छत्रपती संभाजीनगर येथील आर्किटेक्ट पवन वर्धमान अजमेरा (वय ५३) यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. या अपघातात त्यांची पत्नी वीणा अजमेरा आणि मुलगी इशा जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजमेरा कुटुंब सोमवारी मुंबईहून छत्रपती संभाजीनगरकडे परतत होते. वैजापूर शिवारात ओव्हरटेक करत असताना त्यांच्या कारची अज्ञात वाहनाशी जोरदार धडक झाली. धडकेनंतर कार रस्त्याच्या कडेला फेकली गेली आणि काही क्षणांतच तिने पेट घेतला. कार चालवत असलेल्या पवन अजमेरा यांना जबर मार लागल्याने आणि आगीत अडकून पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मागील सीटवर बसलेल्या पत्नी वीणा आणि मुलगी इशा या जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आल्या.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य हाती घेतले. नगरसेवक प्रकाश चव्हाण, उद्योजक शांतीलाल पहाडे, तसेच गोपाल जोहरे, कृष्णा राठोड, मिथुन राठोड, पालवे, कांबळे, रंधे आदींनी धाव घेत बचावकार्य केले. पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली जखमींना वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, अपघातापूर्वी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास इशाने आपल्या काकांना “आम्ही वैजापूरजवळ चहा घेतलाय, आता थेट घरी येतोय,” अशी माहिती दिली होती. मात्र अवघ्या तासाभरातच तिच्याच फोनवरून अपघाताची दुर्दैवी बातमी मिळाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
काही दिवसांपूर्वीच अजमेरा कुटुंबाने नवीन घरात गृहप्रवेश केला होता. सुटीसाठी मुंबईला गेलेले हे कुटुंब परत येत असतानाच काळाने घाला घातला. पवन अजमेरा यांच्या निधनाची वार्ता शहरात पसरताच नातेवाईक आणि मित्रपरिवाराने रुग्णालयात मोठी गर्दी केली. पत्नी वीणा यांची प्रकृती स्थिर असून मुलगी इशाला किरकोळ दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*