छत्रपती संभाजीनगर : शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि वाढत्या तक्रारींचा विचार करून पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत शहरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले असून, तृतीयपंथीय व काही गटांकडून होणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांवर आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हा आदेश १५ एप्रिल २०२६ ते १३ जून २०२६ या कालावधीसाठी लागू राहणार आहे.
गेल्या काही दिवसांत शहरातील विविध भागांतून तक्रारी येत होत्या की, काही तृतीयपंथीय तसेच इतर गट लोकवस्तीमध्ये किंवा रस्त्यावर एकत्र येऊन नागरिकांकडून जबरदस्तीने पैसे उकळत आहेत. तसेच वाहनचालकांना ट्रॅफिक सिग्नलवर अडवून पैशांची मागणी करणे, न दिल्यास दमदाटी करणे असे प्रकार वाढले होते. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलत लग्नकार्य, धार्मिक विधी किंवा इतर खासगी कार्यक्रमांमध्ये निमंत्रणाशिवाय प्रवेश करण्यास सक्त मनाई केली आहे. तसेच कोणत्याही नागरिकांच्या घरात किंवा आस्थापनांमध्ये बेकायदेशीररीत्या प्रवेश करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
याशिवाय शहरातील चौक, ट्रॅफिक जंक्शन आणि सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन वाहनचालक किंवा प्रवाशांकडून पैसे मागणे, धमकावणे किंवा त्रास देणे यावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. सण-उत्सव किंवा कुटुंबातील दुःखद प्रसंगी नागरिकांकडून जबरदस्तीने पैसे उकळण्याच्या प्रकारांवरही कडक कारवाई केली जाणार आहे.
पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्पष्ट केले आहे की, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*