छत्रपती संभाजीनगर : वैजापूर तालुक्यातील कापूस वडगाव परिसरात आज सकाळपासून एका छोट्या विमानाच्या वारंवार गिरट्यांमुळे नागरिकांमध्ये काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. विमान कमी उंचीवरून परिसरात सतत फिरत असल्याने अनेकांनी विविध तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली होती. काही नागरिकांनी याबाबत प्रशासनाशी संपर्क साधत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अखेर छत्रपती संभाजीनगर विमानतळ प्रशासनाकडून यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आल्यानंतर नागरिकांचा संभ्रम दूर झाला.
विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ग्लोबल एव्हिएशन कंपनीच्या माध्यमातून वैजापूर तालुक्यातील काही भागांमध्ये जमिनीचे एरियल सर्वेक्षण सुरू आहे. संबंधित कंपनीने यासाठी आवश्यक त्या सर्व अधिकृत परवानग्या घेतल्या असून हे सर्वेक्षण तांत्रिक प्रक्रियेचा भाग असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कापूस वडगाव आणि आसपासच्या परिसरातील भूभागाचे निरीक्षण, नकाशे तयार करणे तसेच भौगोलिक माहिती संकलित करण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, विमान कमी उंचीवरून वारंवार फिरत असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. अनेकांनी आपल्या घराबाहेर येऊन विमानाचे व्हिडीओ आणि फोटो देखील काढले. सोशल मीडियावरही या विमानाबाबत विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.
हे सर्वेक्षण पूर्णपणे अधिकृत असून त्यामागे कोणतीही संशयास्पद बाब नसल्याचे विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले. नागरिकांनी शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*