छत्रपती संभाजीनगर : जालन्याहून उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात आलेल्या एका ३९ वर्षीय महिलेला अज्ञात रिक्षाचालकाने पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिडको बसस्थानकावर उतरल्यावर संबंधित महिलेने बहिणीला फोन करून “हा रिक्षावाला मला कुठेतरी घेऊन जात आहे” असे सांगत मदतीचा आर्त प्रयत्न केला. मात्र काही क्षणांतच फोन बंद झाल्याने कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ३७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला २१ मे रोजी उपचारासाठी जालन्यातून बसने छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाली होती. त्यांच्या आईने त्यांना जालन्यात बसमध्ये बसवले होते. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पीडितेने बहिणीशी संपर्क साधून “मी ट्रॅफिकमध्ये आहे” असे सांगितले होते. त्यानंतर रात्री साडेसातच्या सुमारास त्यांनी सिडको बसस्थानकावर पोहोचल्याची माहिती देत रिक्षाने चिकलठाण्याकडे निघाल्याचे सांगितले.

मात्र अवघ्या काही मिनिटांतच रात्री ७.४८ वाजता पीडितेने पुन्हा फोन करून घाबरलेल्या आवाजात “मी रिक्षात बसलेली आहे… हा रिक्षावाला मला कुठेतरी घेऊन जात आहे” असे सांगितले आणि अचानक कॉल कट झाला. त्यानंतर तिचा मोबाइल बंद लागत असल्याने कुटुंबीयांनी तातडीने डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली.

घटनेनंतर कुटुंबीयांनी सिडको बसस्थानक, परिसरातील रुग्णालये तसेच इतर ठिकाणी शोध घेतला. मात्र महिला आढळून आली नाही. अखेर चिकलठाणा पोलिस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालकाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून संशयित रिक्षाचालकाचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार भास्कर राऊत करीत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,936 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क