छत्रपती संभाजीनगर : शहरात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांना लक्ष्य करून मंगळसूत्र चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईत १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेल्या चार मोटारसायकली असा एकूण ९ लाख ३२ हजार ३९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तब्बल ११ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

२० मे २०२६ रोजी पहाटे पुंडलिकनगर परिसरातील कारगील मैदानाजवळ मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे मंगळसूत्र चाकूचा धाक दाखवून तिघांनी मोटारसायकलवरून पळवून नेले होते. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना गुप्त माहितीच्या आधारे अमोल वैजनाथ गलाटे (वय ३३), मंगेश वाल्मिक शहाणे (वय २५) आणि अल्ताफ मुबारक शेख (वय १९) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी संगनमत करून शहरातील विविध भागांत मंगळसूत्र चोरीचे आठ गुन्हे केल्याची कबुली दिली.

चोरी केलेले सोन्याचे दागिने हे आरोपी त्यांच्या ओळखीतील सोनार शेख सिराजुल हक शेख अन्वर (वय ३६) याच्याकडे विकत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित सोनारालाही ताब्यात घेऊन चोरीतील सोन्याचे दागिने जप्त केले. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या चार मोटारसायकलीही हस्तगत करण्यात आल्या.

या कारवाईमुळे पुंडलिकनगर, जवाहरनगर, चिकलठाणा, सिडको, एमआयडीसी वाळूज आणि सातारा पोलिस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या एकूण ११ गुन्ह्यांची उकल झाली आहे. आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी पुंडलिकनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,010 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क