खुलताबाद : वेरूळ येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या मृत्यू प्रकरणात अखेर पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. वैजापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे आणि पोलीस अंमलदार वाल्मीक बणगे यांना पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी मंगळवारी (दि. १६) निलंबित केले. तसेच, बोरसे कुटुंबीयांचे जबाब नोंदवल्यानंतर उपनिरीक्षक नागरगोजे यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले असून स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २४ मे रोजी वैजापूर पोलीस ठाण्यात धोंदलगाव येथील रवी आवारे यांच्या फिर्यादीवरून प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे यांच्याकडे होता. या प्रकरणातील तिसरा आरोपी संदीप नागरगोजे आवारे हा वेरूळ येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर नागरगोजे आणि बणगे हे १० जून रोजी खासगी वाहनाने वेरूळ येथे गेले होते.

यावेळी दुसऱ्या वाहनातून फिर्यादीसह काही वाळू माफियांचे साथीदारही तेथे पोहोचल्याचे सांगितले जाते. वेरूळमध्ये शिक्षक सुरेश बोरसे यांच्यासोबत झालेला वाद पुढे मारहाणीपर्यंत पोहोचला. या घटनेदरम्यान बोरसे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जिल्हाभर संतापाची लाट उसळली होती. सात दिवस उलटूनही पोलिसांवर कोणतीही कारवाई न झाल्याने विविध स्तरांतून संशय व्यक्त केला जात होता.

दरम्यान, सोमवारी पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी वेरूळ येथे जाऊन बोरसे कुटुंबीयांची भेट घेतली. कुटुंबातील आठ सदस्यांचे जबाब नोंदवून संपूर्ण घटनेची माहिती घेतल्यानंतर सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले. चौकशीत उपनिरीक्षक नागरगोजे आणि अंमलदार बणगे यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर वर्तन केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच नागरगोजे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,349 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क