मुंबई : राज्यभरात चर्चेत राहिलेल्या आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणातील माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. माफीच्या साक्षीदाराने दिलेली साक्ष विश्वासार्ह नसल्याचे नमूद करत न्यायालयाने सर्व आरोपींना संशयाचा फायदा दिला.

या प्रकरणाचा सुरुवातीचा तपास कळंबोली पोलिसांकडून करण्यात आला होता. त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग करण्यात आला. सीबीआयने तपास पूर्ण करून माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण नऊ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयीन सुनावणीदरम्यान पद्मसिंह पाटील यांच्या वतीने सुमारे १,२५० पानांचे लेखी निवेदन सादर करण्यात आले होते.

निकाल सुनावताना विशेष न्यायालयाने तपासातील त्रुटी आणि माफीच्या साक्षीदाराच्या बदलत्या जबाबांवर गंभीर निरीक्षणे नोंदवली. प्रकरणातील माफीचा साक्षीदार बनलेल्या आरोपीने वेळोवेळी आपली साक्ष बदलल्याने त्याची साक्ष विश्वासार्ह मानता येत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. केवळ अशा साक्षीच्या आधारे आरोपींना दोषी ठरविणे शक्य नसल्याचे नमूद करत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

या प्रकरणात पद्मसिंह पाटील यांच्यासह सतीश मंदाडे, मोहन शुक्ल, शशिकांत कुलकर्णी, कैलाश यादव, दिनेश तिवारी, पिंटू सिंह आणि छोटे पांडे यांना आरोपी करण्यात आले होते.

काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर यांची ३ जून २००६ रोजी हत्या झाली होती. मुंबईहून उस्मानाबादकडे जात असताना नवी मुंबईतील कळंबोली येथे त्यांच्या वाहनावर बेछूट गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पवनराजे यांचे राजकीय प्रतिस्पर्धी पद्मसिंह पाटील यांनी सुपारी देऊन हत्या घडवल्याचा आरोप करण्यात आला होता. या खटल्यात आनंदीदेवी निंबाळकर या फिर्यादी होत्या.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

965 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क