छत्रपती संभाजीनगर : “मी तुम्हाला तुमचे भविष्य सांगतो” असे सांगत एका भामट्याने ग्रामपंचायत शिपायाला भरदिवसा गंडा घालून सोन्याची अंगठी आणि रोकड लंपास केल्याची घटना शहरातील मोंढा नाका परिसरात घडली. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश नागोराव कुटेकर (वय ५६, रा. कडेठाण, ता. पैठण) हे कडेठाण ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून कार्यरत आहेत. २१ जून रोजी ते मध्यवर्ती बसस्थानकात उतरून केंब्रिज परिसरात राहणाऱ्या आपल्या मुलीकडे जाण्यासाठी रिक्षाने निघाले होते. मात्र, मोंढा नाका परिसरात रविवार बाजार भरल्याचे लक्षात आल्यानंतर ते तेथेच उतरले.
उड्डाणपुलापासून रविवार बाजाराच्या दिशेने पायी जात असताना कांचन स्टील दुकानासमोर एका अनोळखी व्यक्तीने त्यांना अडवले. “मी तुमचे भविष्य सांगतो, तुमच्या नवरा-बायकोचे पटत नाही, मी तुमचे टिपण बसवून देतो,” असे सांगत त्याने कुटेकर यांचा विश्वास संपादन केला.
यानंतर भामट्याने कुटेकर यांना हातातील सोन्याची अंगठी आणि खिशातील पैसे रुमालात ठेवण्यास सांगितले. कुटेकर यांनी ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि १ हजार ६०० रुपये रुमालात ठेवले. याचवेळी भामट्याने हातचलाखी करत अंगठी व रोकड काढून घेतली आणि रिकामा रुमाल पुन्हा त्यांच्या खिशात ठेवला.
त्यानंतर भामट्याने कुटेकर यांच्या हातात एक खडा देत समोरील लिंबाच्या झाडाखाली जाऊन तो खडा टाकून देवाचे नाव घेण्यास सांगितले. कुटेकर यांनी तसे केल्यानंतर खिशातील रुमाल तपासला असता अंगठी आणि पैसे गायब असल्याचे निदर्शनास आले. तोपर्यंत भामटा तेथून पसार झाला होता. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार इरफान खान करीत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*