शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यादरम्यान, रामा हॉटेलबाहेर मोठा राडा झाला. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेलबाहेर काळे झेंडे दाखवत आंदोलन केले, ज्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या साऱ्या गोंधळात दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे दिसले, ज्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.
दिशा सालियान प्रकरणावर आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती. मात्र, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकार भाजपचे असल्याने त्यांच्या गृहमंत्र्यांनी एसआयटी चौकशी नेमली असल्याचे सांगत, इथे आंदोलन करण्याचा संबंध काय? असा सवाल उपस्थित केला. त्यांनी आरोप केला की, पोलिसांनी केवळ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनाच ताब्यात घेतले आहे. त्याच्या निषेधार्थ दानवे यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला.
त्यानंतर दानवे यांच्या मागणीनुसार, पोलिसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर दानवे कार्यकर्त्यांना घेऊन हॉटेलमध्ये गेले. मात्र, परिस्थिती अजूनही तणावपूर्ण असल्यामुळे हॉटेलबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ही घटना सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास घडल्याने जालना रोडवर वाहतूक कोंडी निर्माण झाली. नोकरदार वर्गाला त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला, आणि या सर्व गोंधळामुळे संतप्त झालेल्या जनतेने दोन्ही पक्षांवर टीका केली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L5VeaWe1xj1HEg4MmTSJ2Q
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*