मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याने राज्यभरात आंदोलन सुरू झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसनेही मूक आंदोलन छेडले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली मूक आंदोलन केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023 रोजी या पुतळ्याचे अनावरण केले होते. हा पुतळा 26 ऑगस्ट रोजी अचानक कोसळला. पुतळा कोसळण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण यामुळे जनतेत संतापाची लाट उसळली आहे. विरोधकांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसही आंदोलन करत असून हे आश्चर्याचे मानले जात आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्यावतीने नेहमीच मोर्चे व आंदोलन होत आहेत. बदलापूर येथील लैंगिक शोषणाच्या घटनेनंतर शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसनेही या घटनेचा निषेध केला आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी क्रांती चौकात मूक आंदोलन केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, शहराध्यक्ष अभिषेक देशमुख, मयूर सोनवणे, विशाल विराळे आदींची उपस्थिती होती.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L5VeaWe1xj1HEg4MmTSJ2Q
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*