छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता खर्चाच्या अहवालाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी तब्बल ५० टक्के नगरसेवकांनी अद्यापपर्यंत त्यांच्या निवडणूक खर्चाचा तपशील सादर केलेला नाही. एकूण ११५ नगरसेवकांपैकी अनेकांनी नियमानुसार अहवाल न दिल्यामुळे प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. खर्चाचा अहवाल सादर करण्याची अंतिम मुदत १५ फेब्रुवारी असून, उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशीही महापालिकेचे संबंधित कार्यालय सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुख्य लेखा परीक्षक शिवाजी नाईकवाडे यांनी दिली.

महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान झाले होते, तर १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात आले. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार निवडणुकीत सहभागी झालेल्या प्रत्येक उमेदवाराला प्रचारासाठी झालेल्या खर्चाचा सविस्तर हिशोब ३० दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. यामध्ये निवडून आलेले नगरसेवक तसेच पराभूत उमेदवार दोघांनाही हा नियम लागू आहे. शहरातील एकूण ८५८ उमेदवारांनी खर्चाचा अहवाल सादर करणे अपेक्षित असून, त्यासाठी दिलेली मुदत आता संपत आली आहे.

दरम्यान, महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी मंगळवारी आयोजित महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या विशेष सभेत याबाबत स्पष्ट इशारा दिला. विहित मुदतीत खर्चाचा हिशोब सादर न करणाऱ्या निवडून आलेल्या नगरसेवकांची सदस्यता रद्द होऊ शकते, तर पराभूत उमेदवारांना पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात येऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.

निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि कायद्याचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी सर्व उमेदवारांनी वेळेत खर्चाचा अहवाल सादर करावा, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहन मुख्य लेखा परीक्षक शिवाजी नाईकवाडे यांनी केले आहे. प्रशासनाच्या या इशाऱ्यानंतर आता किती उमेदवार मुदतीपूर्वी अहवाल सादर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/LC9pzB4lHXXKDuIr4cUPAq?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

645 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क