छत्रपती संभाजीनगर : सामाजिक सलोखा, एकोपा आणि ऐक्याचा संदेश देणारी ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदा अधिक मजबूत होताना दिसत आहे. गणेशोत्सव २०२६ मध्ये ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील तब्बल ४६८ गावांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २४ गावांची वाढ झाली आहे.

जिल्ह्यात यंदा एकूण १,८३४ सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना झाली आहे. २०२४ मध्ये ही संख्या १,६४९ होती, तर २०२५ मध्ये १,७८९ सार्वजनिक मंडळे होती. त्यामुळे गणेशोत्सवातील सार्वजनिक सहभागही वाढल्याचे दिसून येत आहे.

ग्रामीण भागात गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक आणि शांततेत साजरा करण्यासाठी पोलिस प्रशासन तसेच ग्रामस्थांकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. डीजेचा अतिवापर आणि अवाजवी खर्च टाळून सामाजिक उपक्रमांसाठी निधी वापरण्याकडे ग्रामस्थांचा कल वाढत आहे. ‘एक गाव, एक गणपती’मुळे गावातील विविध गट एकत्र येऊन उत्सव साजरा करण्यास प्रोत्साहन मिळत आहे.

पिशोरमध्ये सर्वाधिक सहभाग

‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमात पिशोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ४२ गावांनी सहभाग घेतला असून जिल्ह्यात ही संख्या सर्वाधिक आहे. त्यानंतर करमाड आणि सिल्लोड ग्रामीण हद्दीत प्रत्येकी ४० गावे, तर कन्नड ग्रामीण भागातील ३८ गावांनी एकाच गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. वडोद बाजार हद्दीतील ३४, सिल्लेगाव २९, बिडकीन २४, अजिंठा २३, तर फुलंब्री आणि शिरूर हद्दीतील प्रत्येकी २२ गावांचा यात समावेश आहे.

दरम्यान, सार्वजनिक गणेश मंडळांच्या संख्येत बिडकीन पोलिस ठाणे १२८ मंडळांसह आघाडीवर आहे. पिशोरमध्ये १२३, पाचोड व फुलंब्रीमध्ये प्रत्येकी १२०, तर पैठण शहरात ११८ मंडळे आहेत.

पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी ४६८ गावांनी सामाजिक सलोख्याचा आदर्श घालून दिल्याचे सांगत हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असे म्हटले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

113 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क