छत्रपती संभाजीनगर : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. २५) शहर व परिसरात निघणाऱ्या श्री गणेश विसर्जन मिरवणुका सुरक्षित आणि निर्विघ्नपणे पार पडाव्यात, यासाठी छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल केले आहेत. शहरातील मध्यवर्ती भागासह सिडको-हडको आणि गजानन महाराज मंदिर परिसरातील तब्बल २१ प्रमुख मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ही वाहतूक बंदी सकाळी ७ वाजेपासून विसर्जन मिरवणुका पूर्ण होईपर्यंत लागू राहणार आहे.

पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी याबाबत आदेश जारी केले असून, नागरिकांनी प्रवासासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.

मध्यवर्ती भागातील प्रमुख बंद मार्ग

मुख्य विसर्जन मिरवणूक मार्ग संस्थान गणपती ते गांधी पुतळा, सिटी चौक, गुलमंडी, बाराभाई ताजिया, एस.बी. कॉलेजमार्गे जिल्हा परिषद मैदान असा राहणार आहे. याशिवाय शहागंज चमन, सिटी चौक, जुना बाजार ते भडकल गेट, जिन्सी चौक ते संस्थान गणपती आणि मोंढा ते राजाबाजार या मार्गांवरही वाहतूक बंद राहणार आहे.

सराफा व गांधी पुतळा परिसरातील चेलीपुरा, मंजूरपुरा ते गांधी पुतळा, लोटा कारंजा, रोहिला गल्ली, सराफा रोड तसेच निझामुद्दीन चौक ते शहागंज चमन या मार्गांवरही वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.

पैठण गेट परिसरात कामाक्षी लॉज, सिटी चौक, गोमटेश मार्केट ते पैठण गेट तसेच या मार्गावरील पूर्व-पश्चिम दिशेच्या अंतर्गत गल्ल्यांवरही बंदी राहणार आहे.

सिडको-हडको व मंदिर परिसरातही बंदी

सिडको-हडको भागात चिश्तिया चौक ते बळीराम पाटील शाळा चौक, ओंकार चौक ते सिडको पोलिस स्टेशन, पारसनाथ चौक, टी.व्ही. सेंटर ते स्वर्ग हॉटेल विहीर तसेच चांदणे चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहतूक बंद राहील.

गजानन महाराज मंदिर परिसरात सेव्हन हिल ते शिवाजीनगर, त्रिमूर्ती चौक ते गजानन महाराज मंदिर आणि पटवारी बँक ते गजानन महाराज मंदिर या मार्गांवरही वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

गणेशभक्त आणि नागरिकांनी पोलिसांच्या वाहतूक नियोजनास सहकार्य करून गर्दीच्या ठिकाणी अनावश्यक वाहनांचा वापर टाळावा, तसेच पोलिसांनी सुचविलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

287 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क