छत्रपती संभाजीनगर : लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. गणेश विसर्जनासाठी शहरात २१ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था, तर ४७ ठिकाणी मूर्तिदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. यासाठी महापालिकेचे सुमारे १,४५० अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यंदा प्रथमच नागरिकांना घराजवळील विसर्जन केंद्राची माहिती मिळावी यासाठी महापालिकेने क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत विसर्जनाच्या तयारीची माहिती दिली. जि.प. मैदान, एन-१२, शिवाजीनगर, मुकुंदवाडी, विभागीय क्रीडा संकुल यासह २१ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी १० ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. विसर्जनस्थळी प्रकाशयोजना आणि जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे.
विसर्जनासाठी महापालिकेची १५३ वाहने तैनात राहणार आहेत. यामध्ये मूर्ती संकलनासाठी ५०, निर्माल्य संकलनासाठी ४५, विद्युत व्यवस्थेसाठी १०, पाणीपुरवठ्यासाठी १५, तसेच अग्निशमन व स्वच्छतागृह व्यवस्थेसाठी २५ वाहनांचा समावेश आहे. शहरातील सुमारे ३५० गणेश मंडळांकडून दररोज निर्माल्य संकलन केले जात आहे.
जि.प. मैदानासह निश्चित केलेल्या ठिकाणी ६ फुटांपर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन करता येणार आहे. इतर तलावांमध्ये मूर्ती विसर्जनास परवानगी नसल्याने मोठ्या मूर्तींचे दान करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतः गणेशमूर्ती दान करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरवासीय आणि गणेश मंडळांनीही मूर्तिदान उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त अमोल येडगे आणि महापौर समीर राजूरकर यांनी केले. विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*