छत्रपती संभाजीनगर : ज्या आईच्या कुशीत जन्म घेऊन अवघ्या महिनाभराचा काळ लोटला, त्याच चिमुकल्याला आर्थिक अडचणीपोटी १ लाख २० हजार रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार मुकुंदवाडी परिसरात उघडकीस आला आहे. या घटनेने माणुसकीला हादरा बसला असून, बाळ सध्या नेमके कुठे आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित आई-वडील आपल्या पहिल्या जोडीदारांपासून वेगळे झाल्यानंतर गेल्या तीन-चार वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. ५ जुलै २०२६ रोजी महिलेने घाटी रुग्णालयात एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर ओळखीची कौशल्या बारकू पवार (६५) हिने बाळाच्या संगोपनाबाबत आई-वडिलांवर प्रभाव टाकला. तिची मुलगी सीमा अनिल रेशवाल बाळ खरेदीचा व्यवहार करते, असे सांगून तिने बाळ देण्याचा सल्ला दिल्याचा आरोप आहे.
सुरुवातीला आईने बाळ देण्यास स्पष्ट नकार दिला. मात्र, सीमाने बाळाच्या वडिलांशी संपर्क साधून त्यांचे मन वळवल्याचा आरोप आहे. अखेर ८ ऑगस्ट रोजी आई-वडिलांनी सीमाकडून १ लाख २० हजार रुपये रोख घेत बॉण्ड पेपरवर सही करून अवघ्या एका महिन्याच्या बाळाला तिच्या ताब्यात दिले.
मात्र, दुसऱ्याच दिवशी जन्मदात्या आई-वडिलांना पश्चात्ताप झाला. “आम्हाला पैसे नकोत, आमचे बाळ परत द्या,” अशी त्यांनी सीमाकडे विनवणी केली. मात्र, बाळ बहिणीकडे दिले असून उद्या आणून देते, अशी उत्तरे देत तिने त्यांना अनेक दिवस टाळल्याचा आरोप आहे. अखेर आईने पोलिसांकडे धाव घेतली.
तपासादरम्यान आई-वडिलांनी पैशांसाठी बाळ दिल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. सीमा रेशवाल आणि कौशल्या पवार यांच्याकडून मात्र बाळाबाबत समाधानकारक माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
याप्रकरणी सीमा रेशवाल, कौशल्या पवार आणि जन्मदात्या आई-वडिलांविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांनाही अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना २९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या घटनेमागे बाळांच्या खरेदी-विक्रीचे मोठे रॅकेट आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत. बाळाचा शोध घेण्यासाठीही तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत. एका चिमुकल्याच्या आयुष्याशी झालेल्या या कथित सौद्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*