मुंबई : राज्यातील अनेक भागांत निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांचा या निर्णयात समावेश करण्यात आला असून, दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांसाठी विविध सवलती व उपाययोजना राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

यंदाच्या पावसाळ्यात अनेक भागांत पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिकांवर त्याचा परिणाम झाला. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका आणि ज्वारी यांसारख्या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. काही भागांत पिकांची वाढ खुंटली असून, पाण्याअभावी उभी पिके करपल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यासारख्या उपाययोजना लागू केल्या जाणार आहेत. कृषीपंपांच्या चालू वीजबिलातही सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ७.५ हॉर्सपॉवरपर्यंतच्या कृषीपंपांचे वीजबिल यापूर्वीच माफ करण्यात आले असून, त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या पंपांनाही सवलत देण्यात येणार आहे.

याशिवाय, टंचाई जाहीर झालेल्या गावांमध्ये शेतीपंपांची वीजजोडणी खंडित न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गरजू शेतकरी व शेतमजुरांना अन्नधान्याचा पुरवठा, जनावरांसाठी चारा, आवश्यक ठिकाणी टँकरने पाणी आणि जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्याची तयारी करण्यात आली आहे.

पंचनामे तातडीने पूर्ण करून पिकांच्या नुकसानीची माहिती संकलित करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सवलत आणि रोजगार हमी योजनेंतर्गत अधिक कामे उपलब्ध करून देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीसाठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

546 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क