छत्रपती संभाजीनगर : पोलीस ठाण्यात येणाऱ्या लहान मुलांच्या मनातील भीती दूर करून त्यांना मोकळेपणाने आपली व्यथा मांडता यावी, यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. छावणी पोलीस ठाण्यात बालस्नेही पोलीस ठाण्यासह अधिकारी विश्राम कक्ष आणि महिला विश्रांती कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. या तिन्ही सुविधांचे उद्घाटन आज २० ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्टून चित्रांतून मुलांसाठी आनंददायी वातावरण
पोलीस ठाण्याचे नाव ऐकताच अनेक मुलांच्या मनात भीती निर्माण होते. त्यातच कौटुंबिक वाद, बालकांवरील अत्याचार, हरवलेली मुले, बालमजुरी आणि बालविवाह यांसारख्या प्रकरणांमध्ये मुलांना पोलिसांसमोर आपली बाजू मांडावी लागते. मात्र, पोलीस ठाण्यातील औपचारिक वातावरणामुळे अनेक मुले मनातील गोष्टी सांगण्यास कचरतात.
ही अडचण लक्षात घेऊन छावणी पोलीस ठाण्यात कार्टून चित्रांनी सजवलेला बालस्नेही कक्ष तयार करण्यात आला आहे. या जागेमुळे मुलांना सुरक्षित आणि आनंददायी वातावरणात संवाद साधता येईल. त्यांच्यावर दबाव न आणता, त्यांचे म्हणणे संवेदनशीलतेने ऐकणे आणि गरजेनुसार मदत उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
मुलांच्या हक्कांच्या संरक्षणावर भर
बालकांशी संबंधित प्रकरणांमध्ये त्यांची गोपनीयता जपणे, प्रतिष्ठेचा आदर करणे आणि त्यांच्या सर्वोत्तम हिताला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. बालकांना घाबरवणे किंवा त्यांच्यावर दोषारोप करण्याऐवजी त्यांना विश्वासात घेऊन संवाद साधण्यावर या उपक्रमातून भर देण्यात आला आहे. तसेच बालकल्याण समिती आणि बालसंरक्षण यंत्रणांसोबत समन्वय साधून आवश्यक मदत देण्याची भूमिका पोलिसांनी मांडली आहे.
अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्यांसाठीही सुविधा
पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना कर्तव्य बजावताना विश्रांती मिळावी, यासाठी स्वतंत्र अधिकारी विश्राम कक्ष तयार करण्यात आला आहे. महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीही स्वतंत्र विश्रांती कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे पोलिसांना कामाच्या धावपळीत आवश्यक सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.
या उद्घाटनप्रसंगी पोलीस उपआयुक्त परिमंडळ-१ चे पंकज अतुलकर, छावणी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मजहर सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक डॉ. विवेक जाधव यांच्यासह छावणी पोलीस ठाण्यातील अधिकारी उपस्थित होते.
बालस्नेही कक्षाच्या माध्यमातून केवळ पोलीस ठाण्याचे वातावरण बदलणे नव्हे, तर मुलांचा पोलिसांवरील विश्वास वाढवणे आणि त्यांना सुरक्षितपणे आपले म्हणणे मांडण्यासाठी अनुकूल जागा उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*