छत्रपती संभाजीनगर : सिडको एन-३ भागात एका व्यापाऱ्याच्या बंगल्यात घरफोडी झाली असून, तब्बल ९ लाख २३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. चोरट्याने घराच्या मागील खिडकीची जाळी तोडून दरवाजाची कडी उघडून आत प्रवेश केला. ही घटना १ ते ५ मार्चदरम्यान घडली असून, याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑटोमोबाईल्स व्यवसायिक अमित दिनेश मालाणी (५०, रा. ३८४/ ए, एन ३, टॉडलर्स स्कूलजवळ) हे १ मार्च रोजी कुटुंबासह अहमदाबादला मुलाला भेटण्यासाठी गेले होते. परत येण्याआधी त्यांनी घराची सफाई करण्यासाठी नोकराला पाठवले. त्यावेळी घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसल्याने चोरीची माहिती मिळाली. मालाणी यांनी तातडीने घरी येऊन पाहणी केली असता, घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोठी रक्कम चोरीला गेल्याचे आढळले.
चोरी झालेला मुद्देमाल:
- ४ तोळ्यांचे डायमंडचे मंगळसूत्र
- कानातले ८ ग्रॅमच्या दोन अंगठ्या
- ३ ग्रॅमची बोरबिंदी व ३ ग्रॅमची नथ
- ११ चांदीची नाणी व १२ भाराचे चांदीचे दागिने
- ५ लाख ७८ हजार २०० रुपयांची रोख रक्कम
घटनेची माहिती मिळताच एसीपी रणजित पाटील, पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. घराच्या मागील खिडकीची जाळी तुटलेली दिसून आली, त्यामुळे चोरट्याने याच मार्गाने घरात प्रवेश केला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.
सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. पुंडलिकनगर पोलिस अधिक तपास करत असून, लवकरच आरोपीचा शोध लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*