कन्नड : तालुक्यातील पिशोर खांडीत मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात ऊस वाहतूक करणारा ट्रक उलटला आणि त्याखाली १७ मजूर दबले गेले. या भीषण दुर्घटनेत ४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १३ जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास ऊस वाहतूक करणारा एक ट्रक पिशोर खांडीतून जात असताना अचानक उलटला. या ट्रकवर १७ मजूर ऊसावर बसून प्रवास करत होते. ट्रक उलटताच सर्व मजूर ऊसाखाली गाडले गेले. स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत पोलिसांना कळवले.
अपघाताची माहिती मिळताच कन्नड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी बचावकार्य हाती घेत १३ जणांना बाहेर काढले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातामागील कारणाचा तपास सुरू
हा अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. ट्रक चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, अशा अपघातांना आळा घालण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*