Oplus_131072

छत्रपती संभाजीनगर : देवळाई परिसरात सोमवारी सायंकाळी पाच दुकानांना लागलेल्या भीषण आगीत गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरला. या आगीत सर्व दुकाने, दुचाकी आणि सायकल जळून खाक झाल्या. सिलिंडरच्या स्फोटामुळे दोन इमारतींना तडे गेले आणि सर्व काचा फुटल्या. हा स्फोट इतका भयंकर होता की, सिलिंडर हवेत उडून चौथ्या मजल्यावरील फ्लॅटला मोठे भगदाड पडले. या दुर्घटनेमुळे संपूर्ण देवळाई परिसर दोन तास भीतीच्या छायेत गेला होता.

शॉर्टसर्किटमुळे आग, क्षणार्धात पसरली ज्वाळा

अशोक हिवाळे यांच्या देवळाईतील मुख्य रस्त्यावरील मनजित प्राइडसमोर पाच गाळे आहेत. यामध्ये दूध डेअरी, चपला व फळ विक्रीचे दुकान, फॅब्रिकेशन वर्कशॉप, गादीघर आणि पिठाची गिरणी होती. संध्याकाळी सुमारे ५ वाजता गादीघरात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. दुकानात कापूस, गाद्या असल्याने आगीने क्षणार्धात उग्र रूप धारण केले आणि संपूर्ण परिसर आगीच्या ज्वाळांनी वेढला गेला.

स्थानिकांनी तातडीने धाव घेत पाण्याचा मारा सुरू केला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे अधिकारी दीपराज गंगावणे, हरिभाऊ घुगे, मुश्ताक तडवी, विनायक कदम यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले.

गॅस सिलिंडरच्या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला

आग शमवण्याचे काम सुरू असतानाच फॅब्रिकेशन दुकानामध्ये ठेवलेल्या गॅस सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला. हे सिलिंडर गॅसने भरलेले असल्याने स्फोटाची तीव्रता अधिक होती. या स्फोटामुळे सिलिंडर हवेत उडून जवळच्या दोन ते तीन अपार्टमेंटच्या काचा फुटल्या, तर एका नव्या अपार्टमेंटच्या भिंतीला तडे गेले. स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की, तो शिवाजीनगरपर्यंत ऐकू गेला.

सिलिंडरच्या स्फोटामुळे तिरुमला रॉयल अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील सुहास संत यांच्या फ्लॅटला भगदाड पडले. सुदैवाने संत यांचे कुटुंब घराच्या विरुद्ध दिशेला असल्याने मोठी दुर्घटना टळली.

६० लाखांहून अधिक नुकसान

या दुर्घटनेत पाचही दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार,

  • अशोक हिवाळे (डेअरी दुकान) – ₹१० लाखांचे नुकसान
  • अलीम शेख (चपला दुकान) – ₹८ लाखांचे नुकसान
  • खालिद शेख (गादीघर) – ₹४ लाखांचे नुकसान
  • बाबासाहेब नराळे (फॅब्रिकेशन दुकान) – ₹२ लाखांचे नुकसान
  • स्वाती काळे (पिठाची गिरणी) – ₹३ लाखांचे नुकसान

याशिवाय, सिलिंडर स्फोटामुळे तीनचाकी गाडी, स्पोर्ट्स बाईक आणि इतर साहित्य पूर्णतः जळून खाक झाले आहे.

वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला

अग्निशमन दलाने तातडीने कारवाई करत आग आटोक्यात आणली नसती, तर परिसरातील इतर दुकाने आणि इमारतींना धोका निर्माण झाला असता. स्थानिक रहिवाशांनीही धैर्य दाखवत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

या घटनेने संपूर्ण देवळाई परिसर हादरला असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने व्यापारी वर्गात चिंता पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,047 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क